गडचिरोली : निवडणूक कर्तव्यावर असलेले पोलिस पथक, निवडणूक कर्मचारी, अधिकारी हे रांगेत उभे असोत, किंवा कोणताही मतदार रांगेत उभा असो ,या मतदारांपैकी जर कुणालाही त्रास झाला, तर जिल्हा नियंत्रण कक्ष व तालुका नियंत्रण कक्षाच्या समन्वयाने तालुकास्तरीय शीघ्र प्रतिसाद पथक. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथकाद्वारे रुग्णांना त्वरित आरोग्य सेवा देण्यात आल्या. विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी बुधवारी शीघ्र कृती आरोग्य पथकाद्वारे जिल्ह्यात एकूण ४६ रुग्णांना लागलीच आरोग्यसेवा देण्यात आली .
जिल्हाधिकारी संजय दैने, जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीसाठी आरोग्य विभागामार्फत मतदान केंद्रनिहाय आरोग्यसेवेचे नियोजन करण्यात आले. जिल्हा नियंत्रण कक्षामधून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी सनियंत्रण करीत होते.
तसेच तालुकास्तरावरून वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी नियंत्रण कक्षाद्वारे ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांचा आढावा घेत होते. वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सीएचओ, मानसेवी वैद्यकीय, औषध निर्माण अधिकारी यांचे वेळोवेळी प्रशिक्षण घेण्यात आले होते.
तसेच १४ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत आरोग्य विभागातील एकूण ४६८ कर्मचारी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावून निवडणूक कर्तव्यावर रुजू झाले.
निवडणुकीच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात किरकोळ आजाराच्या ४६ रुग्णांना उपचार करण्यात आले.
प्रत्येक बूथवर आरोग्यसेवक, सेविका, आशा स्वयंसेविका, समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित राहून सेवा दिली. आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे मतदारांना व मतदान यंत्रणेला मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. अहेरी येथील मतपेट्या संकलन केंद्रावर वैद्यकीय पथक तैनात होते.
आरोग्य पथकाद्वारे अनेकांचा तपासला बीपी :
शीघ्र कृती आरोग्य पथकातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रांवर मतदान करायला आलेल्या ज्या मतदारांना
प्रकृती अस्वस्थ वाटत होती, अश्या अनेक मतदारांचा बीपी तपासला. विशेष म्हणजे अहेरी तालुक्याच्या दिनाचेरपल्ली येथील मतदान केंद्रावर आरोग्य विभागाने अहेरी मतदारसंघाचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांची रक्तदाब तपासणी केली.