वर्धा :- कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असून सुद्धा तेथे मागील काही दिवसापासून पाणीटंचाई आहे, म्हणून गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवन भटकावे लागत आहे. उन्हाळ्यात तर पाण्याची टंचाई असते पण हिवाळ्यात सुद्धा सात दिवसाआड पाणी मिळाल्याने नागरिकांना भटकावे लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कामरगावातील काही भागात सरकारी विहिरीवरून पाणी पुरवले जाते तर काही भागात धरणातून तब्बल ५२ गावाला पाणी पुरवले जाते, या दोन्ही पाणीपुरवठा साधनांची पाईपलाईन फुटल्यामुळे या गावाला आठवड्यातून एकचदा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना भटकावे लागत आहे.
गावातील ग्रामस्थांनी पाणी मिळत नसल्याची तक्रार पाणीपुरवठा अधिकाऱ्याकडे केली, पण त्यांनी पाईपलाईन फुटले असे सांगून लक्ष दिले नाही. रब्बी हंगाम सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जावे लागते घरी पाणी नसल्यामुळे वेळात वेळ काढून गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकावे लागते, म्हणून पाणीपुरवठा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन गावातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करावी अशी गावकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.