गडचिरोली : या जिल्ह्यातील अहेरी येथील पोलिसांनी तेलंगणा राज्यातून नावेच्या सहाय्याने ,दारूची वाहतूक करणाऱ्यांना पकडल्याची बातमी समोर आली आहे . यात चार दुचाकी ,व 50 हजार रुपये किमतीची दारू , तसेच तस्करीसाठी वापरलेली नाव पोलीसांनी जप्त केली आहे .
अहेरी तालुक्यातील प्राणहिता नदीजवळ, पोलीस स्टेशन असल्याने दारू विक्री करणारे आपले दारु विकण्यासाठी शक्कल लढवत आहेत .यातच तेलंगणा राज्यातून अहेरीकडे चिंचगुंडी मार्गे प्राणहिता नदीद्वारे ,नावेतून दारू आणल्या जात आहे, अशी बातमी पोलिसांना मिळाली होती.
तेव्हा पोलिसांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून दारूची वाहतूक रोखून दारू जप्त केली. यात पोलिसांनी जप्त केलेल्या मालात अंदाजे 50 हजार रुपये किमतीची दारू, तसेच चार दुचाकी व एक मोठी लाकडी नाव, असा ऐकून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .
पोलिस उपनिरीक्षक चैतन्य घावटे, पोलिस शिपाई शंकर दहीफळे, भारत सागर, गौतम मंडल, चंदू मोहुर्ले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून दारूची अवैध वाहतूक रोखून दारू जप्त केली. दारूची वाहतूक करणाऱ्या इसमांनी दारूचे बॉक्स आणि आपल्या दुचाकी सोडून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी श्रीकांत गज्ञ्जलवार, करण गुरनुले, रितेश मोहुर्ले, सूर्यदेव रत्नावार चौघेही रा. अहेरी आणि राकेश गानलावार रा. चिंचगुंडी यांच्या विरोधात दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास अहेरी पोलिस करत आहेत.