गोंदिया: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.जिल्हा मार्केटिंग फाउंडेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने 18 ऑक्टोबर पासून शासकीय धान केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची सुरुवात केली आहे .
जिल्ह्यातील दोन लाख 76 हजार खातेदार शेतकऱ्यांपैकी एक लाख 73 हजार शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी केली आहे .पिक पाहणीच्या आधारावरच शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी शासनाच्या एन इ एम एल पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे .यात ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करता येणार आहे .यात काही शेतकरी दिवाळी पूर्वी हातात पैसे मिळावे म्हणून धान विक्रीसाठी धान बाजारपेठेत आणत आहेत.
परंतु आत्तापर्यंत केवळ 140 शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्याने, दिवाळीपूर्वी धान खरेदीला सुरुवात होणार कशी? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरीप पणन हंगाम २०२४-२५ मधील सातबारा उतारा, पीक पेरा असलेला, आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाइल नंबर इत्यादी कागदपत्रे घेऊन नजीकच्या केंद्रावर जाऊन विहीत मुदतीत नोंदणी करावी. बिगर आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांनीच मार्केटिंग फेडरेशनच्या खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी करावी, शेतकऱ्यांना धानाची शासकीय खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे, असे जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी कळविले आहे.