भद्रावती : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे
प्रकल्पग्रस्त महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. माया झावरू देवगडे (५७, रा. बरांज मोकासा) असे मृतक महिलेचे नाव आहे.
केपीसीएल कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीच्या झेंडी पॉइंटवर बरांज (मोकासा) येथे ही घटना सायंकाळी ६ वाजता गुरुवारी (दि. ७) उघडकीस आली. मृत्यूचे कारण कळू शकले नाही. वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे रहस्य पुढे येईल. मात्र नागरिकांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
कर्नाटक एम्टा कंपनीत बरांज (मोकासा) येथील माया देवगडे यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली. पुनर्वसन व प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मागील २० वर्षांपासून प्रकल्पग्रस्त नागरिक संघर्ष करीत आहेत. देवगडे या महिलेचाही अनेक आंदोलनात सहभाग होता. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (दि. ६) ही महिला घरून बाहेर निघाली. मात्र, सायंकाळ होऊनही परत आली नाही.
त्यामुळे चिंताग्रस्त कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. नातेवाइकांनाही विचारपूस केली. परंतु कुठेही पत्ता लागला नाही. अंधार झाल्याने बुधवारी शोधाशोध बंद झाली. दरम्यान, आज गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास काही नागरिकांना केपीसीएल कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीच्या झेंडी पॉइंटवर महिलेचा मृतदेह आढळून आला. ही माहिती पसरताच बरांज (मोकासा) येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा मृतक महिलेची ओळख पटली.