भद्रावती : या तालुक्यात जेवणाचे डबे पोहोचवून देण्यासाठी दुचाकीने निघालेल्या युवकांना भरधाव बसने धडक दिल्याने एका युवकासह एका दोन वर्षीय बालकाचाही बळी गेल्याची बातमी समोर आली आहे .
ही भीषण घटना वणी-वरोरा मार्गावरील कावडी फाट्यावर शुक्रवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली. देशराज अच्छेलाल वर्मा (२६, माजरी), प्रिन्सकुमार विनोद राम (१२), अभिमन्यू अशोक कुमार (२, रा. कुचना), अशी मृतकांची नावे आहेत.
माजरी येथील संतकुमार हे हॉटेल व्यावसायिक आहेत. ते नोकरांच्या माध्यमातून परिसरातील ग्राहकांना जेवणाचे डबे पोहोचवून देत असतात . त्यांचा नोकर देशराज हा कुसणा परिसरात जेवणाचे डबे पोहोचून देण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी आपल्या दुचाकीने कुचनाकडे निघाला. त्याच्यासोबत प्रिन्सकुमार व अभिमन्यू हे दोघे बालक मागे बसले होते. कुसना ते कावडी येथे दुचाकी वळण घेत असताना वरोराकडून वणी येथे जाणाऱ्या (एमएच १४ बीटी ५०६४) क्रमांकाच्या बसने जोरदार धडक दिली. या घटनेत देशराजचा जागीच मृत्यू झाला. तर प्रिन्सकुमार व बालक अभिमन्यू कुमार हे गंभीर जखमी झाले.
कावडी व कुचना वसाहतीजवळील बायपास मार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पथदिव्यांची व्यवस्था केली नाही. त्यामुळे सतत अपघात होत आहेत. अपघात होऊ नये, यासाठी प्रशासनाने पथदिवे लावावे, अशी मागणी कावडी व कुचना येथील नागरिकांनी केली आहे .
पोलिसांनी दोघांनाही लगेच उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर तिघांचे मृतदेह कुटुंबीयांना सुपुर्द करण्यात आले.
पोलिसांनी बसचालक चंदू बिरसा कुळयेटी (रा. चंदनवेली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास माजरी पोलिस करीत आहेत.