पालांदूर : दररोजच्या आहारात खाद्यतेल हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रत्येकाच्या आहारात खाद्यतेल गरजेचे असते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून वाढलेले दर आजही तेवढेच आहेत. दिवाळी संपल्यानंतर दर कमी होईल अशी अपेक्षा ग्राहकांची होती. मात्र, दिवाळी संपली तरी खाद्य तेलाचे दर आजही २२०० रुपयांपर्यंत आहेत. त्यामुळे खाद्य तेलाची महागाई सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याने या बद्दल सर्वाना चिंता लागली आहे.
यंदा ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेची अत्यंत नाजूक परिस्थिती आहे. सोबतच शेतीमालाला अपेक्षित दर नसल्याने आवक मंदावलेली आहे.
मात्र, त्या तुलनेत खर्चाचा हिशेब दिवसेंदिवस वाढत आहे. शेवटच्या टोकातला मजूरसुद्धा महागाईचा आलेख डोळ्यासमोर ठेवून माझी रोजी एवढीच कशी अश्या द्विधा अवस्थेत तो आहे.त्या प्रश्नाला उत्तर शेतकरी किंवा गरजू देऊ शकत नाही. कारण, महागाईचा मार सगळ्यांना बसतो आहे.
दिवाळी संपली तरी दर कमी न झाल्याने ग्राहकांना फटका :
सोयाबीनचा वापर खाद्यतेलात मोठ्या प्रमाणात होतो आहे. गत महिना दीड महिन्यापासून बाजारपेठेत सोयाबीनची आवक सुरू आहे. किमान दिवाळीनंतर तरी खाद्य तेलाचे दर कमी होतील, अशी आशा होती. मात्र, सोयाबीन बाजार- पेठेत येऊनसुद्धा तेलाचे दर कायम असल्याने किरकोळ व्यापाऱ्यांसह ग्राहकांत चिंता व्यक्त होत आहेत.
महिना दोन महिन्यांपूर्वी १५०० रुपयांपर्यंत खाद्यतेलाचा डबा मिळत होता. मात्र, केंद्र सरकारने वाढविलेला महसूल किंवा शुल्क अधिक झाल्याने त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना सोसावा लागत आहे.