गोंदिया :या जिल्ह्यातील गेल्या आठवड्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदी केंद्रांना मंजुरी देत खरेदी प्रक्रिया सुरू केली होती. पण नोंदणी कमी झाली असल्याने अनेक केंद्रावर खरेदी सुरू झाली नव्हती.यामुळे खरीप हंगामातील धान विक्रीसाठी हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली होती. पण आता २२ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून सोमवारपासून (दि.११) धान खरेदी प्रक्रियेला गती येणार असल्याची माहिती समोर आली आहे .
आता आठ दिवसात जड धानाच्या कापणी आणि मळणीला सुरुवात होणार आहे.आणि खरीप हंगामातील हलक्या धानाची कापणी आणि मळणी पूर्ण झाली आहे. तर त्यामुळे २५ नोव्हेंबरपासून धान खरेदी केंद्रावरील धानाची आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे . त्या अनुषंगाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने तयारी पूर्ण केली आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्याकरिता गेल्या वर्षीपासून शासनाने ऑनलाइन नोंदणी अनिवार्य केली आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना धानाची विक्री करता येत नाही.
बोनससाठी नोंदणी अनिवार्य जिल्ह्यातील २२ हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे तर जवळपास पुन्हा दीड लाखाच्या वर शेतकऱ्यांची नोंदणी होणे बाकी आहे. नोंदणीत वाढ झाल्याने आता जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ८० पेक्षा अधिक केंद्रांना धान खरेदीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी विवेक इंगळे यांनी सांगितले आहे .
शासनातर्फे गेल्यावर्षीपासून धानाला हेक्टरी बोनस जाहीर केला जात आहे. बोनसचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. त्याशिवाय बोनसचा लाभ मिळणार नसल्याचे शासनाने आधीच स्पष्ट केले आहे. नोंदणी केल्यानंतर धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणे अनिवार्य नाही. हमीभावापेक्षा अधिक दराने शेतकरी कुठेही धानाची विक्री करू शकतात.