भंडारा : या जिल्ह्यातील धुसाळा (कांद्री) येथे मागील काही दिवसांपासून धान पिकासाठी वातावरण अनुकूल नसल्याने याचा परिणाम शेतीवर झालेला आहे. यामुळे शेतकर्यांना चांगलाच फटका बसला आहे. या सोबतच धान पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जात आहे.
मागील काही दिवसांपासून तुडतुड्यांनी धानाच्या ऑब्याच फस्त केल्यामुळे कांद्री परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे तोंडापर्यंत आलेला घास तुडतुड्यांनी हिसकावून घेतल्याने शेतकऱ्याचे अश्रू अनावर झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पावसाने चांगलीच हजेरी लावली होती . त्यामुळे शेतकरी राजा ही सुखावला होता .त्यामुळे धान पिकाचे उत्पादन चांगले होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली होती. मात्र कांदरी परिसरात ऐनवेळी धान पूर्णत्वात आल्यावर धान पिकावर हिरवे, तपकिरी, तसेच पांढऱ्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला अन्नाचा घास हिरावल्यामुळे आता शेतकरी हवालदिल झालेला आहे.
आता येत्या पाच ते सहा दिवसात धान कापणीला जोमाने सुरुवात होणार आहे. पण अशातच अचानक तुडतुड्यांचा प्रादुर्भावाने धान पिकावर कीड निर्माण होऊन शेतकऱ्यांवर संकटाचा आभाळ कोसळलेला आहे. शेतकरी दरवर्षी शेतात मोठ्या आशेने धान पिकाची लागवड करतो, परंतु
नेहमीच शेतकऱ्यांच्या हिस्स्याला निराशाच मिळत असते. देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमी धान ,संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पीकविम्याच्या माध्यमातून सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तुडतुड्यांच्या रोगाने शेतीतील उभ्या धान पिकाची नासधूस झाली आहे. धान्याच्या कापणी आणि मळणीचा खर्च देखील परवडणाऱ्या सारखा नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शासन प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. असे मत धुसाळा येथील शेतकरी रोशन पुडके यांनी व्यक्त केले आहे.