पालांदूर : शेतकऱ्यांना आधारभूत केंद्रात धान विक्री करण्याकरिता आधार मिळाला आहे. कार्यालयाच्या मंजुरीनंतर ५८ आधारभूत केंद्रांमधून धान खरेदीचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधारभूत केंद्रात धान विक्री करण्याकरिता आधार मिळाला आहे. यात ‘अ’ दर्जाची १८, तर ‘ब’ दर्जाच्या ४० खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे.
तब्बल ४० दिवसांच्या उशिराने जिल्ह्यात धान खरेदीचा शुभमुहूर्त निघाला आहे. १ ऑक्टोबरपासून खरीप हंगामात आधारभूत खरेदी केंद्रातून खरेदी होणे महत्त्वाचे आहे. मात्र, दरवर्षीच ठरलेल्या मुहूर्तावर धान खरेदी होताना दिसत नाही. आधारभूत खरेदी केंद्राच्या समस्या आणि शासनाच्या अटी-शर्ती यांच्यात ताळमेळ बसत नाही. दरवर्षी समस्या आवासून उभ्या राहतात. त्यांचा फटका मात्र धान उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. धान उत्पादक शेतकरी अजूनही शासनाच्या धोरणाच्या खन्य लाभापासून लांबच आहे.
लाखनी तालुक्यातील बऱ्याच केंद्रात अजूनही नोंदणीचे नियोजन झालेले नाही. त्यामुळे शेतकरी दररोज विचारणा करीत आहे. आधारभूत खरेदी केंद्रधारकांनी शेतकरी हित नजरेसमोर ठेवून नोंदणी सुरू करावी. जेणेकरून शासनाच्या आधारभूत किमतीचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल.
धान खरेदी होणार २०९ केंद्रातून:
जिल्ह्यात २०९ केंद्रांतून धान खरेदी होणार आहे. त्याच्यातील पहिल्या टप्प्यात ५८ धान खरेदी केंद्रांना पणन कार्यालयाने उद्दिष्टांसह परवानगी दिली आहे. खरेदी झालेल्या धानाची उचल किमान महिनाभरात होणे गरजेचे आहे. खरेदीनंतर लगेच भरडाईचे नियोजन केले गेले तर खरेदी केंद्रांना तूट अत्यल्प येणार आहे. ही तूट शासनाने मंजूर केलेली आहे. या त्रिसूत्री धोरणाने केंद्रधारक शेतकरी व शासन या तिघांचे उद्दिष्ट पूर्ण होतील.
जिल्हा पणन कार्यालयाकडे नोंदणीकरिता पत्रव्यवहार केलेला आहे. दोन-तीन दिवसांत नोंदणीकरिता परवानगी मिळणार आहे.
- सुनील कापसे, सचिव, सेवा सहकारी संस्था, पालांदूर.
अटी-शर्ती पूर्ण केलेल्या परवानगी प्राप्त ५८ केंद्रांना उद्दिष्टासह खरेदीची परवानगी दिली आहे. उर्वरित इतरही केंद्रधारकांनी आवश्यक कागदपत्रे देत नोंदणी व खरेदी सुरू करावी. धान उत्पादक शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याचीही दखल घ्यावी.
- एस. बी. गद्रे, जिल्हा सहायक पणन अधिकारी, भंडारा.