भंडारा : या जिल्ह्यात रेती चोरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून जेसीबी मशीन आणि रेतीची विनापरवाना वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त केल्याची बातमी समोर आली आहे.
मध्य प्रदेशातील गावात अनधिकृत रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहेत. या डम्पिंग यॉर्डमधून रात्री महाराष्ट्राच्या सीमेत रेतीची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती . तेव्हा पोलिसांनी सापळा रचून नाकाबंदी दरम्यान जेसीबी मशीन आणि रेतीची विनापरवाना वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त केले.
यात ४५ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यात आरोपी सोंड्याटोला धरण मार्गावरून रेतीची चोरटी वाहतूक महाराष्ट्रात करीत होते. तेव्हा ट्रकमध्ये असलेल्या रेतीची पोलिसांनी चौकशी केली असता ,रॉयल्टी नसल्याचे दिसून आले.त्यामुळे विनापरवाना रेतीची वाहतूक करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी काही मोबाइल जप्त केले असून ४५ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी आतिश तुकड्डू पटले (२८) रा. डोंगरला, दिनेश सुदाम मोहनकर (२२) रा. खापा, गौरीशंकर उर्फ गोलू सुधाकर शेंडे (२३) रा खरबी, चंद्रशेखर शंकर कुसराम (२३) रा. सिहोरा, शुभम रामा देव्हारे (२३) रा मोहाडी खापा, राकेश रामकृष्ण राऊत रा. डोंगरला यांचे विरोधात गुन्हा दाखल केला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक नितीन मदनकर, राजू साठवणे, तिलक चौधरी, महेश गिन्हेपुंजे, निबेश मोटघरे यांनी केली.