भंडारा : या जिल्ह्यातील नामांकन अर्ज मागे घेतल्यानंतर आता तिनही विधानसभा मतदार संघातील चित्र स्पष्ट झाल्याचे दिसत आहे.भंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघ मिळून ५० उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी भंडारा विधानसभा क्षेत्रात १९, तुमसरमध्ये १८ तर साकोलीमध्ये १३ उमेदवार रिंगणात आहेत.
त्यामुळे चिन्हवाटप होताच बहुतेक सर्वच उमेदवारांनी प्रचाराचे नारळ फोडून आपल्या प्रचार कार्यालयाची फितही कापली. ज्येष्ठांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली. जिल्ह्यात आता प्रचाराचे भोंगे फिरायला लागले असल्याने निवडणुकीचा ज्वर हळूहळू चढायला लागला आहे.
निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांना फक्त १३ दिवसांचा कालावधी मिळणार असल्याने सर्वांचीच धावाधाव होणार आहे. भंडारा मतदार संघात भंडारा आणि पवनी या दोन तालुक्यांचा समावेश आहे. तुमसर मतदार संघात तुमसरसह मोहाडी तालुक्याचा समावेश आहे. तर, साकोलीत साकोलीसह लाखनी, लाखांदूर या तीन तालुक्यांचा समावेश आहे. तुमसर मतदार संघ दुर्गम असल्याने उमेदवारांना कमी
कालावधीत अधिक गावापर्यंत पोहोचण्याचे नियोजन करावे लागत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसह पदयात्रा, रॅली काढून निवडणूक
प्रचाराला सुरुवात झाली आहे, गुरुवारपासून महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभाही सुरू झाल्या आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचार सभांचे नियोजनही केले जात आहे.