भंडारा : या जिल्ह्यातील भोजापुर गावात एका स्कूल व्हॅनने एका मुलाला धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी आरटीओ विभागाने स्कूल व्हॅन तपासणी करून चालान सुरू केले. परंतु यात चालान खूप जास्त असल्याने मागील पाच ते सहा दिवसांपासून स्कूल व्हॅन चालकांनी आपली वाहने बंद ठेवली आहेत .
चालकांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये त्यांच्या मागण्या आहेत की, आरटीओ यांच्या सूचनेनुसार जे वाहन खरेदी करावे, असे सांगण्यात येत आहे ते मोठे असून शहरातील रस्ते ,त्यामानाने अरुंद असल्यामुळे ते खरेदी करणे शक्य नाही.नऊ प्लस एक अशी व्हॅन उपलब्ध असून नागपूर पॅटर्ननुसार आहे, त्या व्हॅनला टॅक्सी म्हणून परमिट द्यावी.अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तर स्कूल व्हॅन बंद असल्याने याचा पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे .एकाच घरातील दोन वेगवेगळ्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना, पालकांनी सोडावे कसे ?हा प्रश्न पालकांसमोर उभा झालाय ,त्यामुळे पालकांनी स्कूल व्हॅन सुरू करावी अशी मागणी केली आहे.
मात्र आरटीओंच्या चालान कारवाईच्या भीतीमुळे व्हॅन चालकांनी वाहने बंद ठेवली आहेत. एखाद्या अपघातानंतर संपूर्ण वाहनच बंद करण्याचा प्रकार आजपर्यंत झालेला नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळाचे प्रतिनिधी म्हणून परमानंद मेश्राम, श्रीकांत बनसोड, सुनील केलवाडे, निकेश नागदेवे, संदीप गभणे, शेखर शेंडे, रवी कढव, सुशील हटवार, कुणाल आंबीलकर, राहुल सोनटक्के, रवी टेंभुर्णे, रोशन नागुलवार, राजू थोटे, रत्नदीप मेश्राम, संघदीप गजभिये आदींचा समावेश आहे.