कुरखेडा : गडचिरोली या जिल्ह्यात सध्या विधानसभा निवडणुकांसह मंडई उत्सवाचा धडाका सुरू आहे. त्यामुळे अनेक लोक यासाठी नटूनथटून येत असतात . मात्र, हे महिलांना महागात पडू शकते. कारण मंडई उत्सवातून लाखोंच्या दागिन्यांची चोरी झाल्याच्या घटना दरवर्षी घडत असतात . आणि त्यामुळेच मंडई उत्सवात गर्दी राहत असल्याने चोरटे सक्रिय झालेले असतात. त्यासाठी नागरिकांनी वेळीच सावध होण्याचे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी मंडई उत्सवाची धामधुम हमखास पाहावयास मिळते. मंडई उत्सवामध्ये विविध कार्यक्रमांवर खर्च केला जात आहे.
त्याचबरोबर पाहुणे मंडळीही मंडई बघण्यासाठी दुरून दुरुन आलेले असतात. आणि महिला या कार्यक्रमानिमित्त नटून असतात. गर्दीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यासह परराज्यांतील अनेक टोळ्या जिल्ह्यात सक्रिय असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिलांनी सावध असावे. गळ्यातील, पर्समधील दागिने सांभाळावे, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.
मंडई उत्सवात गर्दी असल्याने सावध राहण्याचे आवाहन :
महागडे दागिने परिधान करताना दक्ष रहावे. गर्दीच्या ठिकाणी आजूबाजूला लक्ष ठेऊन असावे . अनोळखी व्यक्ती जवळ आल्यास सावध राहावे . चोरीची माहिती तत्काळ डायल ११२ ला कळवा. महिलांच्या गळ्यातील दागिने अलगद चोरण्यासाठी आठ ते दहा वयोगटातील लहान मुलांचा वापर चोरट्यांकडून केला जात असल्याचा नवा ट्रेंड सुरू आहे .