चंद्रपूर (सास्ती) : राजुरा तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांना धान कापणीच्या कामात अडचणींचा सामना करावा लागत आहे. परतीच्या पावसामुळे आधीच नुकसान झालेल्या पिकांची कापणी वेळेत पूर्ण न झाल्यास धानाचे आणखी नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
धान कापणीसाठी आधुनिक यंत्रणा अपुरी असल्याने शेतकऱ्यांना मजुरांवर अवलंबून राहावे लागत आहे.सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक आले आहे. त्यासोबतच कापूस वेचणी जोमाने सुरू आहे. त्याकरिता अनेक ठिकाणांहून मजूर स्थलांतरित केले जात आहेत. या ठिकाणी मजुरी जास्त मिळत असल्याने धान मजुरांची धाव त्या भागात जास्त आहे. त्यामुळे धान कापणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे.
शेतात आजही धान पिके उभी असून, कापणी त्वरित न झाल्यास धान पीक खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावल्याचे चित्र दिसून येत आहे.
मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांच्या समस्येवर तोडगा काढावा :
शेतकऱ्यांच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने तत्काळ यंत्रे उपलब्ध करून द्यावे .तसेच मजूर उपलब्धतेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी विनंती केली आहे.
तसेच, यापुढे अशी स्थिती टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. या संकटाचा गांभीर्याने विचार करून तातडीने पावले उचलली नाही, तर याचा फटका शेतीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बसण्याची शक्यता आहे.