चंदपूर : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटाला लावलेली अमीट शाई लावण्यात येणार आहे.
यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी आयोगाने राज्यात सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्यांची तरतूद केली आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात १ लाख ४२७ मतदान केंद्रे असून प्रत्येक केंद्रावर शाईच्या दोन बाटल्या दिल्या जाणार आहे.
त्याचाच भाग म्हणून सहाही मतदारसंघातील २ हजार २७७ मतदान केंद्रांवर मतदारांच्या बोटाला शाई लावण्यासाठी ४ हजार १५४ बाटल्या यासाठी पुरवण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात २ हजार २७७ मतदान केंद्र आहे. यामध्ये सर्वाधिक चंद्रपूर विधानसभेत तर सर्वात कमी चिमूर विधानसभेत मतदान केंद्र आहे. यावेळी १८ लाख ५० हजार १०२ मतदार असून त्यांच्या बोटाला शाई लावण्यात येणार आहे.
एकाच कंपनीकडून पुरवठा
- शाईच्या बाटल्या निवडणूक विभागाकडे सुपुर्द करण्यात येतात. देशात एकमेव कंपनी म्हैसूर पेंट्स आणि वार्निश लिमिटेड शाईचे उत्पादन करते.
१९३७ मध्ये कंपनीची स्थापना झाली असून एमव्हीपीएलद्वारे ही शाई फक्त सरकार किंवा निवडणूक संबंधित एजन्सींना पुरविण्यात येते.
मतदान करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईबद्दल :
ही शाई इंडेलिबल इंक म्हणून ओळखली जाते. ही शाई केवळ भारतातच वापरली जात नाही तर जगातील इतर देशांतही ही शाई वापरली जाते.
मतदानानंतर शाईने खूण करणे बंधनकारक आहे. जगातील जवळपास ९० देशांमध्ये या शाईचा वापर होतो. त्यापैकी ३० देशांमध्ये म्हैसूर पेंट्स आणि वॉर्निश लिमिटेड शाई पाठवते. या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट केमिकलचे प्रमाण १० ते १८ टक्के असते.
बोटावर ही शाई लागल्यानंतर शरीरातील मिठासोबत प्रक्रिया होऊन सिल्व्हर क्लोराइड तयार होते. सिल्व्हर क्लोराइड पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे त्वचेवर त्याची राहते.
बोटावर शाई लावल्यानंतर अगदी काही सेकंदात त्याची खूण उमटते आणि ४० सेकंदातच ती पूर्णपणे सुकते. विशेष म्हणजे, पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर तिचा रंग काळा होतो. कितीही धुतले तरी हा डाग निघत नसतो. किमान ७२ तास तरी त्वचेवर या शाईचा डाग काढता येत नाही.
निवडणुकीत मतदान केल्यानंतर लावण्यात येणारी शाई ही डाव्या हाताच्या तर्जनीच्या नखापासून बोटाच्या पहिल्या पेरावर ब्रशने लावली जाते. ही शाई लावताना बोटांचा प्राधान्यक्रम कसा असावा, याबाबत २०२१ च्या निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आधी एखाद्या निवडणुकीत तर्जनीला शाई असेल तर नवीन शाई मध्यमा किंवा मधल्या बोटावर लावली जाते.