गोंदिया :या जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे . यात महायुतीचे जागा वाटपाचे चित्र स्पष्ट झाले असले ,तरी महाविकास आघाडीचे अद्याप झाले नाही आहे. मात्र, अनेक उमेदवारांनी एबी फॉर्मची वाट न पाहता अर्ज भरण्याचा मुहूर्त साधल्याचे दिसून आले.
गेल्या दोन दिवसांत महायुतीच्या एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता. यात १७५ अर्जाची उचल झाली होती,परंतु केवळ दोन अर्ज दाखल झाले होते. मात्र, गुरुवारी गुरुपुष्यामृत योग असल्याने काही उमेदवारांनी हा मुहूर्त साधत अर्ज दाखल केले.
गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनासह महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला, तर आमगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी गुरुवारी मुहूर्तासाठी अर्ज दाखल केला.