गोंदिया : या जिल्ह्यातील सेवानिवृत्त परिचराला सातव्या वेतन आयोगाचा हप्ता काढून देण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापक, सहायक शिक्षक व शाळेची देखभाल करणाऱ्या खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची बातमी समोर आली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम मांडोखालटोला येथील प्रशिक विद्यालयात सोमवारी (दि.११) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली होती . लाचखोर आरोपींमध्ये प्रभारी मुख्याध्यापक विलास गोपाळा नाकाडे (५६), सहायक शिक्षक अशोक पांडुरंग लंजे (५४) व ज्ञानेश्वर वामन नाकाडे (३६, रा. कोरंबीटोला) यांचा समावेश आहे.
तक्रारदार (६५, रा. अर्जुनी-मोरगाव) हे मांडोखालटोला येथील प्रशिक विद्यालयात परिचर पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. सातव्या वेतन आयोगाच्या तीन हप्त्यांची रक्कम प्राप्त करण्यासाठी ते शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विलास नाकाडे, वेतन व भत्त्याचे बिल तयार करणारे शिक्षक अशोक लंजे व शाळेच्या कार्यकारिणीने दिलेल्या कुलमुखत्यार पत्रानुसार शाळेची देखभाल करणारे खासगी व्यक्ती ज्ञानेश्वर नाकाडे यांना भेटले असता त्यांनी १५ हजार रुपये लाच मागितली होती .
त्यामुळे तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी १४ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीच्या आधारे पथकाने १५ ऑक्टोबर रोजी पडताळणी केली असता तिन्ही आरोपींनी तक्रारदाराकडे सातव्या वेतन आयोगाचे तीन हप्ते मिळवून देण्याकरिता १५ हजार रुपये लाच रकमेची मागणी केली होती . तर शिक्षक अशोक लंजे याने लाच रक्कम देण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.११) तिनही आरोपींना प्रशिक विद्यालयातून ताब्यात घेतले. आणि अर्जुनी-मोरगाव पोलिस ठाण्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक राजीव कर्मलवार, उमाकांत उगले, सहायक फौजदार करपे, हवालदार मंगेश कहालकर, नायक पोलिस शिपाई संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, महिला शिपाई संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक शिपाई दीपक बाटबर्वे आदींनी केली आहे.