गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १२ नोव्हेंबरला रात्री ताब्यात घेतले.
दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून ५४ हजार रुपये स्वीकारणाऱ्या व उर्वरित ९६ हजारांची फोनवरून मागणी करणाऱ्या लिपिकाला अटक करण्यात आली . विकी भास्कर प्रधान (३०) असे त्या लिपिकाचे नाव आहे.
तक्रारदार हा सफाई कंत्राटदार असून, त्याने पोलिस ठाणे, मुख्यालय आदी ठिकाणच्या सेप्टिक टाक्यांच्या सफाईचे काम हाती घेतले होते. याचे बिल काढून दिल्याच्या मोबदल्यात इमारत शाखेचा लिपिक विकी प्रधान याने दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याने आधी दोन टप्प्यांत ५४ हजार रुपये स्वीकारले व उर्वरित रकमेपैकी दहा हजार रुपये आणून दे, अशी मागणी फोन करून केली. शिवाय, राहिलेल्या पैशांची नंतर व्यवस्था करून दे, अशी मागणी केली.
यासंदर्भात २४ ऑक्टोबरला कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर त्याच दिवशी एसीबी पथकाने पडताळणी केली असता, पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
लाच मागितल्याची कबुली :
विकी प्रधानने स्वतःच्या लग्नावेळी कंत्राटदाराकडून ५० हजार रुपये लाच स्वरूपात स्वीकारले होते. त्यानंतर ४ हजार रुपये स्वीकारले. उर्वरित ९६ हजारांची मागणी केली. पडताळणीत त्याने स्वतःच ही बाब मान्य केल्याचे निष्पन्न झाले.