चंद्रपूर : ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ ही योजना राबविण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत घेतला आहे. या योजनेअंतर्गत प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या ‘ऑटोमेटेड पर्मनंट विद्यार्थ्यांना अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री आयडी’ (अपार कार्ड) दिला जाणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या ‘अपार कार्ड’च्या माध्यमातून नवी ओळख मिळणार आहे. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीची संपूर्ण माहिती या ओळखपत्रात असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपार कार्ड’ ही विद्यार्थ्यांसाठी नवीन ओळख देणारी प्रणाली आहे. त्यामध्ये या विद्यार्थ्यांना बारा अंकी क्रमांक असलेले कार्ड दिले जाणार आहे. संबंधित क्रमांक त्या विद्यार्थ्यांची ओळख असणार आहे. या क्रमांकावर असलेल्या कार्डमध्ये प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शैक्षणिक नोंदीचा समावेश असणार आहे . शिक्षण विभागाकडून या कार्डसाठीच्या नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीची सगळीकडे जोरदार तयारी सुरू आहे. अनेक शिक्षकांची मतदार केंद्रांवर नियुक्त्ती करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांचे प्रशिक्षणही सुरू आहे, तर काही शिक्षकांना बीएलओ पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्वामध्ये ‘अपार’ची नोंदणी करताना शिक्षकांना ‘अपार कष्ट करावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अपार कार्ड बद्दल माहिती :
या कार्डमध्ये विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, पत्ता, त्याची शाळा, महाविद्यालय, इयत्ता, त्याचा निकाल, त्याला मिळालेले पुरस्कार, शिष्यवृत्ती आदी माहिती उपलब्ध असणार आहे.
एज्युलॉकरसारखी ‘अपार कार्ड’ प्रणाली असणार आहे. त्यात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एकत्रित उपलब्ध असणार आहे.
ते आधार कार्डशी जोडले जाणार असल्याने विद्यार्थ्यांना हे कार्ड अधिक उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये पालकांच्या आधार क्रमांकाचाही समावेश करण्यात येणार आहे. या कार्डमुळे सर्व शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.