चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व त्याहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने घरातूनच मतदान करण्याची सोय सुरू केली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील ८५ वर्षांवरील आणि दिव्यांग, अशा २ हजार ८० मतदारांनी घरून मतदानाच्या हक्क बजावला असल्याची माहिती समोर आली आहे . यामध्ये १ हजार ७११ मतदार हे ८५ वर्षांवरील, तर ३६९ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.
वयाची ८५ वर्षे पूर्ण केलेले तसेच दिव्यांग असलेले मतदार मतदान करण्यासाठी केंद्रांपर्यंत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे , ते लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवापासून वंचित राहतात. अशात त्यांनाही आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने घरातूनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी त्यांना १२-डी फॉर्म भरून द्यावा लागतो.
निवडणूक विभागाकडून विशेष पथकाने वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना घरातूनच मतदान करण्याची सोय व्हावी यासाठी गठन केले होते. या पथकाच्या उपस्थितीत मतदारांचे मतदान करून घेण्यात आले.
विधानसभा निवडणुकीसाठी काही मतदार रुग्णालयात तर काही मतदारांचा मृत्यू :
गृहमतदानासाठी काही मतदारांनी अर्ज केला. त्यानुसार प्रशासनाने तयारी केली. दरम्यान, घरोघरी जाऊन मतदान करून घेतले. मात्र, काही मतदार रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही गृह मतदान पथकाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या मतदारांना आता केंद्रातच जाऊन मतदान करावे लागणार आहे.
२० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी ८५ वर्षांवरील वयोवृद्ध मतदारांनी १२ डी फार्म भरून गृह मतदानासाठी प्रशासनाकडे अर्ज केला होता. त्यानुसार प्रशासनाने गृह मतदान करून घेतले. दरम्यान, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील दोघांसह अन्य मतदारसंघांतील काही मतदारांचा मतदानापूर्वीच मृत्यू झाला.