गोंदिया : या जिल्ह्यात जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी व निर्भय मुक्त वातावरणात विधानसभा निवडणूक व्हावी यासाठी जिल्हा पोलिस विभाग सतर्क झाला आहे. यातूनच उपद्रवी संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांची करडी नजर असून मागील आठ दिवसांपासून संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिस घिरट्या घालत आहेत. जिल्ह्यातील अशात ११५ संवेदनशील केंद्रांवर ‘पोलिसांचा वॉच’ आहे.
गोंदिया विधानसभा मतदारसंघातील तीन मतदान केंद्र, अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातील ३४ तर आमगाव विधानसभा क्षेत्रातील ७८ असे ११५ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील ११५ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. यामध्ये जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्याने पोलिसांनी त्या दिशेने उपाययोजना केल्या आहेत. लोकशाही बळकट व्हावी यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या मतदान केंद्रांवर पोलिसांची करडी नजर आहे. पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर, आमगावचे महेंद्र मडामे यांनी विभागातील संवेदनशील मतदान केंद्रांवर स्वतः जाऊन पाहणी केली आहे.
विधानसभा निवडणूक निर्भय मुक्त व्हावी यासाठी पोलिसांनी काढली रूट मार्च :
जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी रूट मार्च काढून आपली ताकत दाखविली आहे. गावागावांत विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस सतर्क आहेत. या अगोदर ज्या मतदान केंद्रांवर बेशिस्तीने मतदान झाले किंवा मतदान करताना ज्या ठिकाणी हस्तक्षेप झाला असेल अशा केंद्रांना संवेदनशील ठरवून पोलिसांनी त्यावर करडी नजर ठेवली आहे.