गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस दलातील सी-६० हे विशेष पथक सज्ज झाले आहे. एकीकडे प्रभावी नक्षलविरोधी मोहीम, दुसरीकडे आत्मसमर्पण यामुळे नक्षल चळवळीला एकामागून एक धक्के बसत आहेत. मात्र, निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी नक्षल्यांच्या प्रत्येक हालचालीवर अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे .
लोकसभा निवडणुकीत एका मतदान केंद्रावरील हल्ल्याचा प्रयत्न हा एकमेव प्रकार मागे घडला होता. फक्त हा अपवादवगळता शांततेत मतदान झाले. निवडणुकीपूर्वीच नक्षल्यांचे मनसुबे उधळून लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले होते.
त्यामुळे आतासुध्दा विधानसभा निवडणुकाही शांततेत व सुरक्षित वातावरणात व्हाव्यात, याकरिता पोलिस दलाकडून व्यूहरचना आखली जात आहे. छत्तीसगड व तेलंगणा सीमेवर १४ ठिकाणी आंतरराज्य तपासणी नाके सुरू केली असून, परराज्यातून येणाऱ्या व गडचिरोलीतून तिकडे जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. पोलिसांकडे १३० अत्याधुनिक ड्रोन कॅमेरे असून त्याचा वापर केला जात आहे. जिल्हाभरात १७ हजार सुरक्षा जवानांची कुमक निवडणुकीसाठी तैनात राहणार आहे. कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत एकही गुन्हा दाखल नाही:
दरम्यान, गडचिरोली जिल्हा अतिसंवेदनशील व नक्षलप्रभावित असतानाही सुदैवाने आतापर्यंत एकही अनुचित घटना ईथे घडलेली नाही. १५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती . त्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत कायदा – सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल, असा एकही गुन्हा नोंद झालेला नाही. यासाठी पोलिसांचे सुक्ष्म नियोजन कामी आले आहे.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी असे म्हटले आहे की,
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही सुरक्षित वातावरणात पार पडेल, छत्तीसगड सीमेवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. सी-६० या जवानांमार्फत नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. जनतेने कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजवावा.