गडचिरोली : या जिल्ह्यात रानटी हत्तींचा कळप सध्या हा देलोडा जंगल परिसरातच वावरत आहे.
कळपात चिमुकल्या नवीन सदस्याची एन्ट्री झाल्यापासून कळपाची चाल मंदावली आहे .
जंगलाच्या परिसरात असलेल्या धान पिकाची नासधूस हत्तीचे कळप करीत आहेत, त्यामुळे ऐन कापणीला आलेले व जमा केलेले धान पिकाचे पुंजणे हत्ती पायदळी तुडवीत असल्याची बातमी समोर आली आहे . रानटी हत्तींच्या कळपाचा वावर महिनाभरापासून पोर्ला वन परिक्षेत्रात आहे. परंतु ,रविवारी हत्तींचे ऑनलाइन लोकेशन वन कर्मचाऱ्यांना सापडत नव्हते. या भागातील शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान रानटी हत्तींनी केलेले आहे.
त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतानाही त्यांना वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हत्तींवर योग्य वेळी नियंत्रण करणे व शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात पोर्ला वन परिक्षेत्र कमी पडलेले आहे. स्थानिक स्तरावर वनरक्षक हे जोमाने काम करीत असले तरी क्षेत्रसहायक निर्वावलेले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून हत्तीच्या वावरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी प्रशासनाकडे केली होती. परंतु , महिनाभराचा कालावधी उलटूनही चुरचुरा उपक्षेत्रातील पीक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही. एका महिन्यात पीक नुकसानीची भरपाई न मिळाल्यास संबंधित शेतकऱ्याला व्याजासह भरपाई द्यावी, असा शासन निर्णय आहे; परंतु याबाबत तक्रारी होत नसल्याने वनाधिकाऱ्यांचे फावले आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने पोर्ला वन परिक्षेत्रातील अधिकारी कर्तव्यात हयगय करीत असल्याचे दिसून येत आहे.
हत्तींचे कळप पीकाचे नुकसान करत असल्याने, शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित :
गेल्या काही वर्षांपूर्वी चुरचुरा उपक्षेत्रात वन जमिनीवर अतिक्रमण करून येथील झाडांची अवैध तोड करण्यात आली होती. तेव्हापासूनच सदर उपक्षेत्र चर्चेत आले होते. आत्ताही या उपक्षेत्रात झाडांची तोड केली जाते . आत्ताही शेतकऱ्यांच्या धान पिकाची हत्तींकडून नासधूस केली जात आहे. असे असतानाही क्षेत्रसहायक व वनरक्षकाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही.
त्यासोबतच रानटी हत्तींची देखरेख करणारी व त्यांच्यावर नियंत्रणासाठी नेमलेली पश्चिम बंगालमधील हुल्ला टीम सध्या कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे . त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याकडे वडसा वन विभागाच्या उपवनसंरक्षकांचेही दुर्लक्ष होत आहे. त्यांचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.