गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी ९३ उमेदवारांपैकी तब्बल ३९ उमेदवारांनी माघार घेतली.उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता चारही मतदारसंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तर निवडणुकीच्या रणसंग्रामाला आता सुरुवात होणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी गोंदिया आणि तिरोडा मतदारसंघात बंडखोरी टाळण्यात प्रमुख पक्षांच्या नेत्यांना यश आले.तर आमगाव आणि अर्जुनी मोरगाव मतदारसंघांत बंडखोरी कायम असल्याने पक्षाच्या उमेदवारांची डोकेदुखी कायम आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान व २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्याकरिता २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ३० ऑक्टोबरला अर्जाची छाननी केल्यानंतर ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया झाली
जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, गोंदिया, आमगाव आणि तिरोडा या चारही मतदारसंघांतून एकूण ९३ उमेदवारांनी १३४ अर्ज दाखल केले होते .सोमवारी यापैकी ३९ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता चारही मतदारसंघांत एकूण ६४ उमेदवार रिंगणात आहेत.
यात सर्वाधिक २१ उमेदवार तिरोडा, तर १९ उमेदवार गोंदिया विधानसभा मतदारसंघात आहेत. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला बंडखोरांचे मन वळविण्यात यश आले. महायुतीतील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रत्नदीप दहीवले यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महायुतीची थोडी डोकेदुखी कायम आहे.