गडचिरोली : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुती व महाविकास आघाडीत बंडखोरी उफाळून आली. आता रुसवे-फुगवे, धुसफूस अन् कुरघोडीचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. यामुळे दोन्हीकडील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, भाजपने राज्यातील ३७ विधानसभा क्षेत्रात बंडखोरी करणाऱ्या ४० जणांवर निलंबनाची कारवाई केली, पण अहेरीत महायुतीधर्म नाकारून अपक्ष मैदानात उतरलेल्या अम्ब्रीशराव आत्रामांचा यात समावेश नाही. दुसरीकडे काँग्रेसनेही अद्याप बंडखोरांबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे प्रमुख उमेदवार संभ्रमात आहेत.
गडचिरोली व आरमोरी वगळता अहेरीत महायुतीमध्ये बंडखोरी झाली तर महाविकास आघाडीत तिन्ही क्षेत्रांत बंडखोरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून कोंडी केली. दुसरीकडे महायुती व महाविकास आघाडीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांत काही ठिकाणी संवाद होत नाही आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळ तापत आहे.
अम्ब्रीशरावांवर कारवाई करा अन्यथा, आरमोरी,
गडचिरोलीत असहकार्य, मित्रपक्ष राष्ट्रवादीचा इशारा
अहेरीत बंडखोरी केल्याने अम्ब्रीशराव आत्राम व त्यांच्या समर्थकांवर भाजपने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास मित्रपक्ष राष्ट्रवादीने आरमोरी व गडचिरोलीत असहकार्याचा इशारा दिला आहे. वासेकर यांनी ६ नोव्हेंबरला याबाबत पत्रक जारी करून भाजपची डोकेदुखी वाढवली आहे.