वर्धा : या जिल्ह्यामध्ये भारतीय चलनातील नोटांचे स्क्रॅप
भरुन मुजफ्फरनगर येथे जात असलेल्या १४ चाकी ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे . ही घटना मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे . या घटनेत ट्रकमधील नोटांचे स्क्रॅप पूर्णतः जळून खाक झाले असून महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केले आहे.
नोटांचे स्क्रॅप एका ट्रकमध्ये भरून नेण्यात येत होते, तेव्हा रस्त्यामध्येच ट्रकला अचानक आग लागली.
ट्रक चालक जसवंत सिंग त्रिलोक सिंग (वय ४५ रा. मेरठ उत्तरप्रदेश) आणि सहचालक भोपाळ दाताराम (वय ६०) हे दोघे ट्रकमध्ये भारतीय चलनातील नोटांचे स्क्रॅप भरुन हैदराबाद ते मुजफ्फरनगर येथे जात होते. दरम्यान कांढळी ते बरबडी रस्त्यावर कांढळी शिवारात ट्रकमध्ये स्पार्किंग झाल्याने ट्रकने अचानक पेट घेतला. दरम्यान ट्रकमधील नोटांचे स्क्रॅप जळून खाक झाले. याची माहिती जाम महामार्ग पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. या पध्दतीने आग विझविण्यात आली होती . सुदैवाने जीवितहानी या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.
सदर घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस आणि हिंगणघाट पोलिसांनी धाव घेतली. आगीची घटना घडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. दरम्यान महामार्ग पोलिसांच्या सुरक्षा पथकाने तसेच आग विझविल्यानंतर हायड्राच्या मदतीने जळलेला ट्रक रस्त्याकडेला हलवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.या प्रकरणामध्ये नोटांचा अंश असलेले काही कागद अर्धवट जळाले होते . आणि जळालेल्या कागदांमध्ये नोटांचे स्क्रॅप असल्याने नागरिकांना हा ट्रक नोटांनी भरला असल्याचा संशय आला आणि त्यांनी विविध समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल करुन नोटा भरलेल्या ट्रकला आग लागल्याचे दाखविले.