गडचिरोली (कुरखेडा ): चिऱ्यांच्या दगडांची वाहतूक करणारे ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात ट्रॅक्टरचालकासह दुचाकीस्वारही जागीच ठार झाल्याची बातमी समोर आली आहे . ट्रॅक्टर चालक रोहित नरोटे (३०, रा. तुलतुली, ता. आरमोरी) व दुचाकीस्वार महेंद्र दुगा (३०, रा. काकडयेली, ता. धानोरा) अशी मयतांची नावे आहेत. दुचाकीवरील प्रल्हाद गोटा (रा. सोनसरी, ता. कुरखेडा) हा थोडक्यात वाचला.ही घटना १४ नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता तालुक्यातील उराडी येथे कुथे पाटील हायस्कूलजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनसरी येथील डोंगरावरून चव्हेला तलावाच्या बांधकामाकरिता दगडे घेऊन ट्रॅक्टर (एमएच ३३ एफ-३२८०) जात होता. त्याचवेळी दुचाकी (एमएच ३३ वाय-५४५३) समोरून येत होती. दोन्ही वाहनांची उराडीजवळ समोरासमोर धडक झाली.
यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर अपघातानंतर ट्रॅक्टर उलटल्याने त्याखाली सापडून चालकाचा मृत्यू झाला, असे हा अपघात बघणारकयांनी सांगितले . त्यानंतर दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
त्यासोबतच देसाईगंज ते लाखांदूर मार्गावरील कार्मेल कॉन्व्हेंटजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला आहे . ही घटना १३ रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. अनिकेत ईश्वर आदे (२१, रा. नवीन लाडज, ता. देसाईगंज) असे मयताचे नाव आहे. तो देसाईगंजवरून दुचाकीने गावी परतत होता. ट्रकने (सीजी ०४ एलएस- २४५८) त्यास धडक दिली. यात तो जागीच ठार झाला. दरम्यान, लाखांदूरकडून दुचाकीवरून येणाऱ्या शैलेश शालिक मेश्राम (२३, रा. जांभूळखेडा, ता. कुरखेडा) यास दुचाकीने हुलकावणी दिली. दुचाकी घसरून तो कोसळला. रुग्णालयात नेताना वाटेत त्याचा मृत्यू झाला.
आलापल्लीवरून पेरमिलीकडे जाणाऱ्या दुचाकीला एस.टी. बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. त्याची ओळख अद्याप पटली नाही. त्याच वाचविताना बस रस्त्याच्या खाली उतरली. वाहकाच्या प्रसंगावधानाने प्रवासी सुखरूप बचावले. ही घटना १४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आलापल्ली-भामरागड मार्गावरील तलवाडाजवळ घडली, अहेरी आगाराची बस (एमएच ४० एक्यू ६०९४) सकाळी ७:४५ वाजता अहेरी आगारातून लाहेरीमार्गे सुटली. त्याच वेळी दुचाकी (एम.एच. ३३ पी. ८६८२) आलापल्लीवरून पेरमिलीमार्गे जात होता.