पालांदूर: भंडारा जिल्ह्यात पट्टीदार वाघीण जंगलाच्या परिसरात फिरत असते . वनविभागाला ही वाघीण परिचित आहे. तिला दोन बछडे आहेत . मिळालेल्या माहितीनुसार कोका, रावणवाडी व किटाडी, मांगली परिसरात ती गेल्या दहा वर्षांपासून फिरत आहे. आजपर्यंत तिने जिवीतहानी केलेली नाही. यापूर्वी सुद्धा जंगल परिसरातील नागरिकांनी वाघीणीसह तिच्या बछड्यांना अनेकदा बघितले आहे. मंगळवारी एका घटनेत वाघिणीने गायीची शिकार केली होती .
अमर ठवरे (किटाडी) असे पशू मालकाचे नाव आहे. वनविभागाने घटनेचा पंचनामा करून नोंद घेतली आहे. घटनेची माहिती वनविभागाला मिळताच अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहचले. बुधवारी सकाळी त्याच शिकार स्थळी वाघिणीचा एक बछडा आला असता वनविभागाने कॅमेऱ्यात कैद केला. उपवनसंरक्षक राहुल गवई, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक येवतकर, क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर, बीट रक्षक नितीन पारधी, गायकवाड, रंगारी, देशमुख, शहारे व वनमजूर घटनेवर लक्ष ठेवून आहेत. त्यानंतर काही वेळाने तिने बछड्यांना शिकार स्थळी आणले.
यादरम्यान, किटाडी मांगली या जंगलव्याप्त परिसरात पट्टेदार वाघीण व तिचे दोन छावे फिरत असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले. यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वाघिणीने तलावाच्या काठावर गायीची शिकार केली होती.यामुळे पुन्हा दहशत पसरली असून, वनविभाग वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत.
पट्टेदार वाघिणीशी सावध असण्याचे वनविभागाचे आवाहन :
परिसरातील गावकऱ्यांनी सावधानगिरी बाळगावी .व वन्यप्राण्यांना त्रास होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, अशा सूचना वनविभागाने केल्या आहेत. जंगल परिसरात वाघ बघण्यासाठी धाडसी साहस करू नये. वाघाचे छावे त्रस्त होऊन हिंसक होऊ शकतात, असेही सुचविले आहे.