गोंदिया : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी, याकरिता सुव्यवस्था भंग करणाऱ्या तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैधरीत्या देशी कट्टा बाळगणाऱ्या एका युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे . व त्याच्याकडून कट्टा जप्त करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. ग्रामीण पोलिस ठाण्याअंतर्गत आंबाटोली परिसरातील त्याच्या घरी शनिवारी (दि.१६) ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अधीक्षक गोरख भामरे व अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी निर्देश दिल्यानंतर आंबाटोली निवासी आरोपी दिनेश ऊर्फ नानू रूपसिंग दमाहे (४०) याच्याकडे देशी कट्टा असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने त्याला शनिवारी (दि.१६) ताब्यात घेतले असून देशी कट्टा जप्त केला.
देशी कट्टा बाळगणाऱ्या युवकावर गुन्हा :
पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संजय तुपे, पोलिस उपनिरीक्षक शरद सैदाने, हवालदार राजू मिश्रा, महेश मेहर, चित्तरंजन कोडापे, नेवालाल भेलावे, चालक पोलिस शिपाई घनश्याम कुंभलवार यांनी ही कारवाई केली आहे. आरोपीवर कलम ३, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.