गोंदिया (अर्जुनी मोरगाव) : घरात पतीचा मृतदेह असतांना, कुटुंबात दुःखाचे सावट सर्वत्र पसरलेले असतांना, जन्मदात्याचे छत्र हरविल्याने मुलीसुद्धा शोकसागरात असतांना, घरचा धनी एकाएकी सोडून गेल्याच्या दुःख वियोगात असलेल्या एका पत्नीने व दोन मुलींनी मतदान केंद्रात जाऊन मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे . ही घटना अर्जुनी मोरगाव येथील वॉर्ड क्रमांक १७ मध्ये घडली.
अर्जुनी मोरगाव येथील रहिवासी शंकर ग्यानबा लाडे हे पत्नी वर्षा, मुली लक्ष्मी व खुशी तसेच वयोवृद्ध आई सताबाई यांच्यासह वॉर्ड क्रमांक १७ मध्ये आनंदाने राहत होते. प्रकृती बिघडल्याने वयाच्या ४७ व्या वर्षी शंकर लाडे यांचे बुधवारी (दि. २०) सकाळी ६ वाजता निधन झाले.
घरात मृत्यू झाला असतांना, घरच्यांनी मतदान करून मतदानाचे महत्त्व दिले पटवून :
या घटनेमुळे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे . हे विपरित घटना घडली असतांना, पतीच्या दुःखवियोगात असलेल्या त्या मायमाउलीने मतदान करण्याचा निर्णय घेतला. आणि मतदान केले. मृतदेह घरात असताना सुद्धा घरच्या सर्व मंडळींनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावून मतदानाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर दुपारी दोन वाजता शंकर लाडे यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.