गोंदिया : गोंदिया येथील दासगाव माकडी रस्त्यावर पोलिसांनी दुचाकीवरून गांजाची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रावणवाडी पोलीसठाण्याअंतर्गत दासगाव माकडी रस्त्यावर ,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंगसाठी पहाटे निघाले होते.तेव्हा त्यांना एक व्यक्ती संशयास्पद आढळून आला ,त्याच्या गाडीत बोरी दिसून आली, त्या बोरी बद्दल पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांने नीट उत्तरे दिली नाही .त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी बोरीची तपासणी केली .बोरीची तपासणी केली असता, त्यात पाच पाकिटांत हिरव्या रंगाचा ओलसर गांजा आढळून आला.
यातील आरोपी घनश्याम टोलीराम तुरकर (रा. तेढवा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडील गांजा, वाहन, मोबाईल व इतर साहित्य जप्त केले. हे साहित्य एकूण दोन लाख नऊ हजार तीनशे रुपयांचा आहे. या प्रकरणामध्ये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आरोपीविरुद्ध रावणवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २०, २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, अंमलदार प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, छगन विठ्ठले, घनश्याम कुंभलवार यांनी केली आहे.