वडकी (यवतमाळ) : खैरी- कोच्ची येथील इयत्ता नववीच्या दोन विद्यार्थिनीचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी एक वाजता सोमवारी घडली. या घटनेमुळे परिसरात शोककाळ पसरली आहे.
या घटनेत तीन विद्यार्थिनी दुपारच्या सुट्टीत पोहण्यासाठी वर्धा नदीवर गेल्या. या विद्यार्थिनी लोक या महाविद्यालयातील इयत्ता नववीतील विद्यार्थिनी होत्या .यात खुशी किशोर राऊत (१५, रा. खैरी), प्रांजली भानुदास राखुंडे (१५, रा. कोच्ची) अशी मृत मुलींची नावे आहेत.
तर तिसऱ्या मुलीची म्हणजेच सानियाची तब्येत ठीक नसल्यामुळे ते पाण्यात उतरली नाही, त्यामुळे ती बचावली. तर खुशी व प्रांजली या नदीपात्रात पोहण्यासाठी उतरल्या व त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या.
सानियाने आपल्या मैत्रिणींना बुडतांना बघितले, व त्याना वाचविण्यासाठी गावातील लोकांना बोलावून घेतले. त्यानंतर गावकरी नदीवर पोहोचले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. काही वेळात वडकी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिस व गावकऱ्यांनी नदीपात्रात शोध घेऊन दोन्ही मुलींना बाहेर काढले. त्यांना खैरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही मुलींना मृत घोषित केले. दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी केली जाणार आहे.